नागरिकांना आणि मुख्यत्वे विद्यार्थ्यांना इतिहासाची जवळून ओळख व्हावी, या उद्देशानं नागपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर वडगाव धरण परिसरात पसायदान परिसराची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूरच्या मुंडले एज्युकेशन ट्रस्टनं ही निर्मिती केली आहे. महाराष्ट्र भूषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते काल या अध्यात्मिक स्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. या पसायदान परिसरात ध्यानमंडप उभारण्यात आला असून, तिथं ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातले संत, इतिहासातली प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि समाजसुधारकांची भित्तीचित्रही काढण्यात आली आहेत. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पासह महाराजांच्या सहा किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. परिसराला भेट देणाऱ्या नागरिकांना पसायदानाचं महत्वही सांगण्यात येत असल्यानं इथं पर्यटकांची गर्दी होत आहे.